Rajmudra Films Official

नाट्यं भिन्नरुचे: जनस्य
बहुधाप्येक समाराधनम्
नानारुचि रसिकां दे केवळ
नाटक पुरें समाधान

उधळले विश्वात ह्या कैक रंग कुणी
एक रंग घडविते ही क्षेत्र रंगभूमी
सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी
नम्र विजेत्यांचे अस्मान रंगभूमी
गुणी दिग्गजांचा ही श्वास रंगभूमी
गंधर्व, पु.ल., वि.वांचा इतिहास रंगभूमी
मज नवख्याचेही झेलते ही पाय रंगभूमी
अन लेकरागत घडविते ही माय रंगभूमी

बिनधास्त गप्पा
With Celebrity
कलाकार घडण्याची गोष्ट

मराठी कलाकार त्यांचे
नाटक, मालिका, चित्रपट
यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम

कलेच व्यासपीठ🎭🎬
नाटकांच्या मुलाखती 🎭

#rajmudra_films
#bindhastgappa
#bindhastgappawithcelebrity
#बिनधास्त_गप्पा

राजमुद्रा फिल्म्स वर आत्तापर्यंत
आपण ढोल ताशा पथक तसेच
सण उत्सव, महाराष्ट्राची संस्कृती,
धार्मिक स्थळे, कला, क्रिडा
यांचे व्हिडिओ पाहिले असतील
पण आता राजमुद्रा फिल्म्स
सादर करत आहे
एक नवा कोरा कार्यक्रम
यात नाटक, चित्रपट, मालिका
आणि साहित्य क्षेत्रात
नावलौकिक मिळालेल्या कलाकारांच्या
आठवणींचा कलापट आपल्यापुढे
सादर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे



Rajmudra Films Official

बहुचर्चित चित्रपट ‘खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या विचारांनी आणि जीवनमूल्यांनी आजही लाखो लोकांना योग्य दिशा दिली आहे. याच विचारांना एका वेगळ्या आणि संवेदनशील कथेतून मांडणारा 'खालिद के शिवाजी' हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

पी.पी.सिनेप्रोडक्शन प्रस्तुत 'खालिद के शिवाजी' या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्या प्रभावी भूमिका असून, खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने अत्यंत सहजतेने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे. अमेरिकेतील अग्रगण्य मानसिक आरोग्य सेवा संस्था Omni Health Care Services चे अध्यक्ष असलेले मायकल थेवर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दिग्दर्शक राज प्रितम मोरे म्हणाले, 'खालिद के शिवाजी' हा माझा पहिला मराठी चित्रपट असून, या चित्रपटासाठी मी दोन ते तीन वर्षे मेहनत घेतली. आज हा चित्रपट Apple TV, BookMyShow आणि YouTube Movies वर जगभर प्रदर्शित होत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारे निर्माते मायकल थेवर आणि संपूर्ण टीमचे मी ऋणी आहे. अकोल्यातील नागरिकांनी चित्रीकरणादरम्यान दिलेले प्रेम आणि सहकार्यही माझ्यासाठी कायम स्मरणात राहील. "ही एका निरागस मुलाची खालिदची कथा आहे. समाजव्यवस्थेतील दोषपूर्ण रचनेचा तो नकळत बळी ठरतो. या व्यवस्थेतून स्वतःला मुक्त करण्याचा तो प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या समोर जात, धर्म, लिंग, पंथ, वंश आणि अशा अनेक सामाजिक भेदभावांचे कटू वास्तव उलगडत जाते.एका लहान मुलाच्या नजरेतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या समाजात आजही खोलवर रुजलेल्या अन्यायकारक आणि विषारी व्यवस्थेचे शुद्धीकरण व्हावे, समानता, मानवता आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी, हा या कथेचा प्रामाणिक उद्देश असल्याचे दिग्दर्शक राज प्रितम मोरे सांगतात.

‘आजच्या काळात समाजाला जोडणाऱ्या कथा सांगण्याची गरज आहे. खालिदच्या निरागस नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खरा अर्थ उलगडत जातो’. धर्म, जात आणि सामाजिक भेदांपलीकडे जाऊन माणुसकीच सर्वश्रेष्ठ आहे, हा संदेश हा चित्रपट देतो. हा अनुभव प्रत्येक प्रेक्षकाने घ्यावा’, असे निर्माते मायकल थेवर यांनी सांगितले.

चित्रपटात खालिद नावाच्या एका निरागस मुस्लिम मुलाची कथा उलगडते. शाळेत त्याला 'अफजलखान' म्हणून चिडवलं जात असल्यामुळे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या जीवनमूल्यांचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
समाजात वाढत चाललेल्या धार्मिक आणि सामाजिक दुराव्याच्या पार्श्वभूमीवर एक मुस्लिम मुलगा शिवाजी महाराजांच्या विचारांचा शोध घेतो, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरली. याच आशयामुळे या चित्रपटाची प्रतिष्ठित Marché du Film या विभागात, कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये निवड झाली होती, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरली. तसेच इफ्फी (IFFI) इंडियन पॅनोरामा, गोवा २०२५ आणि अजिंठा–वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Ajanta-Ellora International Film Festival) अंतर्गत India Focus Special Screening साठी चित्रपटाची निवड झाली होती.

विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर या परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा गोडवा अनुभवायला मिळतो. स्थानिक कलाकारांचा मोठा सहभागही या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. विदर्भातील अनेक नवोदित कलाकारांना जागतिक प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे.

चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी ज्यांची राहून गेली, तसेच पुन्हा एकदा या विचारप्रवर्तक कलाकृतीचा अनुभव घ्यायचा असेल, अशा सर्व प्रेक्षकांसाठी आता ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 'खालिद के शिवाजी' आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असून, संपूर्ण कुटुंबासोबत या आशयघन, संवेदनशील आणि प्रेरणादायी चित्रपटाचा नक्की आस्वाद घ्या.

3 days ago | [YT] | 4

Rajmudra Films Official

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’
मालिकेचा नवा डिजीटल प्रवास

२० जून पासून ‘मराठी वारसा’
यूट्यूब वाहिनीवर पहिला भाग प्रसारित

अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

‘मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात प्रथमच एखादी मालिका अशा स्वरूपात पुनरागमन करत आहे. फुले दांपत्यांनी समाजपरिवर्तनासाठी दिलेला लढा, शिक्षणाची क्रांती आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा, हाच या पुनर्प्रवासामागील आमचा उद्देश आहे. ही मालिका केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीव जागवणारी आणि प्रेरणा देणारी चळवळ आहे’, असे या मालिकेच्या डिजीटल प्रवासाबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा हा डिजीटल प्रवास अनेक निर्मात्यांसाठी पथदर्शी ठरू शकतो. या प्रवासाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून अनेक मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमाबद्दल सकारात्मक भावना आणि उत्सुकता निश्चितच आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्तीची आणि मांडणीची अधिक व्यापक संधी उपलब्ध असते. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत कथा ज्या स्वरूपात पोहोचवायची आहे, ती अधिक प्रभावीपणे मांडता येते. तसेच, या विषयाला व्यापक स्वरूप देण्यासाठी आपण भविष्यात संसदेतही हा मुद्दा मांडणार असल्याचे संकेत डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले.

‘सध्या ही मालिका सर्वप्रथम ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर डिजीटल माध्यमांवर विस्तार करण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असून योग्य वेळेनुसार पुढील निर्णय घेतले जातील. येत्या काळात हिंदी, तामिळ, तेलगू, इंग्रजी, बंगाली या पाच विविध भारतीय भाषांमध्ये डब करून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

डिजीटल माध्यमामुळे कलाकार आणि निर्मात्यांमधील अंतर कमी होत असल्याचे सांगत डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, ‘आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर ऑडिशन टॅब सुरू केला असून, महाराष्ट्रातील नवोदित आणि गुणवंत कलाकारांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कलाकारांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट आमच्याशी जोडता येईल.’ सर्जनशीलतेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत मालिकेच्या डिजीटल प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शब्दांत सांगितले कि आता ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका केवळ आमची राहिलेली नाही, तर ती आता संपूर्ण महाराष्ट्राची मालिका झाली आहे.

"मराठी मनोरंजन क्षेत्रात आशयप्रधान आणि लोकाभिमुख कंटेंटसाठी नवे मार्ग खुले करण्याच्या उद्देशाने आम्ही सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात अनेक सर्जनशील प्रयोगांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

3 weeks ago (edited) | [YT] | 7

Rajmudra Films Official

३० वर्षांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांची जोडी रंगभूमीवर परतणार; 'आता थांबवायचं कसं?' मधून उलगडणार आजच्या कुटुंबाची गोष्ट!

''फोन स्मार्ट झाला अन् माणूस बावळट!'; आजच्या पिढीचे आणि पालकांचे डोळे उघडायला येतंय सुकन्या मोने-डॉ. गिरीश ओक यांचं नवं नाटक!

मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, चोखंदळ प्रेक्षकांसाठी एक कमालीची सुखद आणि भावनिक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यवर्तुळात ज्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाच्या नावाची आणि भक्कम स्टारकास्टची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील दोन महामेरू म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक तब्बल ३० वर्षांनंतर एकाच नाटकात मुख्य भूमिकेत एकत्र येत असून, या बहुप्रतिक्षित नाटकाचे नाव आहे ‘आता थांबवायचं कसं?’

"मुलीचा बाप म्हणून ती कथा पाहून मी आतून हादरलो!" - डॉ. गिरीश ओक

३० वर्षांनंतर सुकन्या मोने यांच्याशी पुन्हा जुळलेल्या समीकरणाबद्दल डॉ. गिरीश ओक भावूक होत सांगतात की, "सुकन्यासोबत ३० वर्षांनंतर नाटकात काम करताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याच प्रवासात तिचं आणि संजयचं लग्न आमच्या डोळ्यांदेखत झालं होतं. आज एका नव्या केमिस्ट्रीसह आम्ही एकत्र आलो आहोत. मी पनवेलच्या एका स्पर्धेत ही कथा एकांकिका स्वरूपात पाहिली होती आणि एक मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो होतो. हा विषय व्यावसायिक रंगभूमीवर येणं काळाची गरज आहे, असं वाटल्याने मी याचा पाठपुरावा केला.

आजच्या काळात 'निर्जीव फोन स्मार्ट होत चालला आहे आणि जिवंत माणूस बावळट', हे भीषण वास्तव आहे. सोशल मीडियाचा निष्काळजी वापर आणि तरुण पिढीची बेफिकीरी यामुळे संपूर्ण कुटुंबावर कसं वादळ येऊ शकतं, यावर हे नाटक बोट ठेवतं. एक अभिनेता म्हणून यातला 'बाप' साकारताना मला वैयक्तिक आयुष्यातही त्याची तीव्रता जाणवतेय. हे नाटक पालकांना आणि पाल्यांना एकत्र आणून एक निश्चित दिशा देईल, असा मला विश्वास आहे."

"१० वर्षांनंतर रंगभूमीवर येणं ही माझी स्वतःची परीक्षा!" - सुकन्या कुलकर्णी-मोने

तब्बल १० वर्षांनंतर रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या सुकन्या मोने या भूमिकेबद्दल सांगतात की "२०१४ मधील ‘सेल्फी’ नंतर मी नाटक केलं नव्हतं. पण ‘आता थांबवायचं कसं?’ ची संहिता माझ्या मनाला स्पर्श करून गेली. 'कुसुम मनोहर लेले' आणि 'जुळून येती रेशीमगाठी' नंतर गिरीशबरोबर पुन्हा काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच आहे. आमचं 'गिव्ह अँड टेक' इतकं सहज आहे की आम्हाला संवादांचीही गरज पडत नाही.

यात मी साकारत असलेली मध्यमवर्गीय आई अत्यंत आव्हानात्मक आहे. परिस्थितीविरुद्ध बंड पुकारायचं असूनही कौटुंबिक संस्कारांमुळे तिचे हात बांधले गेले आहेत, तिची ही अगतिकता आणि मनातील वादळ साकारताना माझी स्वतःचीच एक परीक्षा चालली आहे. हे नाटक पालकांना आणि आजच्या 'टेक्नोसॅवी' तरुण पिढीला अंतर्मुख करणारं, त्यांचे डोळे उघडणारं आहे. संकटसमयी पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहाचं, हे सांगणारी ही आजची जिवंत गोष्ट आहे."

५ दिग्गज निर्मात्यांची खंबीर साथ

केवळ पडद्यावरचे कलाकारच नाही, तर या नाटकाची निर्मिती बाजूही मराठी रंगभूमीवरील सर्वात भक्कम बाजू मानली जात आहे. रंगभूमीला ‘बोलविता धनी’ सारखी अत्यंत यशस्वी कलाकृती देणाऱ्या प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर या ५ ताकदीच्या आणि दिलदार निर्मात्यांनी या नाटकासाठी एकत्र हातमिळवणी केली आहे. त्यामुळे या नाटकाची निर्मितीमूल्ये अत्यंत दर्जेदार आणि भव्य असणार याची खात्री रसिकांना नक्कीच आहे.

आजच्या काळातील एका गंभीर प्रश्नावर खंबीर भाष्य!

नाटकाची मूळ कथा गुप्त ठेवली असली तरी, या नाटकाचा गाभा आजच्या काळातील प्रत्येक कुटुंबाला विचार करायला लावणारा आहे. एका हसत्या-खेळत्या मध्यमवर्गीय कुटुंबावर जेव्हा अचानक एखादं वादळ घोंगावू लागतं, तेव्हा होणारी पालकांची घालमेल यात दिसेल. आजच्या तंत्रज्ञानाच्या भडिमारामुळे तरुण पिढी आणि पालकांसमोर उभे ठाकलेले गंभीर प्रश्न, आणि अशा प्रसंगात ‘छाती काढून रडायचं की मूठ आवळून लढायचं’ हा पालकांचा संघर्ष यात अतिशय भावनिक पद्धतीने मांडण्यात आला आहे. रक्ताचं पाणी करून वाढवलेल्या लेकरांना वाचवण्यासाठी पालकांनी दिलेला हा लढा पालकांसाठी आणि आजच्या पिढीसाठी एक जिवंत उदाहरण ठरेल.

तगडी स्टारकास्ट आणि कसलेले तंत्रज्ञ

या नाटकात सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेटे यांच्या प्रमुख भूमिका असून, अभिनयाची एक मोठी जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण नाटकाचे सशक्त लेखन आणि दिग्दर्शन संदिप दंडवते यांनी केले आहे. नाटकाच्या देखण्या नेपथ्याची धुरा संदेश बेंद्रे, प्रकाश योजना रत्नाकांत जगताप, संगीत समीर म्हात्रे, वेशभूषा अमृता काकतकर, रंगभूषा राजेश परब यांनी समर्थपणे सांभाळली असून दिपक गोडबोले हे या नाटकाचे सुत्रधार आहेत.

शुभारंभाचे भव्य प्रयोग

• ३० मे २०२६ (शनिवार) दुपारी ४.०० वाजता —
गडकरी रंगायतन, ठाणे.
• ३१ मे २०२६ (रविवार) दुपारी ४.०० वाजता —
रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.

३० वर्षांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक या दोन महामेरूंना पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आता प्रश्न एकच उरतो, रसिकांच्या या आतुरतेला
‘आता थांबवायचं कसं?’

https://youtu.be/MHYBq4nlCG8?si=0sdHJ...

1 month ago (edited) | [YT] | 16

Rajmudra Films Official

बोलीभाषा एकांकिका स्पर्धा जल्लोषात..
('पाकिस्तानचं यान' सर्वोत्कृष्ट)

'सुप्रिया प्रॉडक्शन'तर्फे घेण्यात येणाऱ्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात रंगली. या फेरीत एकूण सात एकांकिका सादर झाल्या. त्यातून 'नाट्यांकुर' या संस्थेची 'पाकिस्तानचं यान' ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. 'सत्य' (द्वितीय), 'पाकळ्या' (तृतीय) आणि प्रेक्षक पसंती एकांकिका म्हणून 'डिझाईन' या एकांकिकांना पारितोषिके मिळाली.
मालवणी, घाटी, माणदेशी अशा विविध बोलीभाषांतील एकांकिका यावेळी सादर झाल्या. सुप्रिया गोविंद चव्हाण यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. 
'सपान' (डॉक्टर्स थिएटर ग्रुप - माणदेशी), 'फ्रीडम ॲट मिडनाईट' (सृजन द क्रिएशन - मालवणी), 'पाकळ्या' (नक्षत्र कलामंच - खान्देशी), 'डिझाईन' (डॉ. टी.के.टोपे रात्र महाविद्यालय - घाटी), 'त्यात काय!' (एकदम कडक नाट्यसंस्था - घाटी), 'सत्य' (नाट्यारंभ एन.के.टी.टी. - मालवणी) आणि 'पाकिस्तानचं यान' (नाट्यांकुर - घाटी)
या एकांकिकांमध्ये अंतिम फेरी रंगली.
रंगकर्मी मिलिंद शिंदे, मंगेश सातपुते व संदीप रेडकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष होते.

5 months ago | [YT] | 10

Rajmudra Films Official

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. संत तुकाराम महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. जीवनप्रवाहात कायम राहून त्यांनी घेतलेला परमेश्वरप्राप्तीचा ध्यास आणि यातून घडलेला त्यांचा आध्यात्मिक प्रवास चकित करणारा आहे. लौकिकाडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. पॅनोरमा स्टुडिओज, चित्रकथी क्रिएशन्स निर्मित ‘अभंग तुकाराम’ ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. पॅनोरमा स्टुडिओचे कुमार मंगत पाठक चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यासोबत अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर यांनीही निर्मितीची धुरा सांभाळली असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित आहे. प्रेमरूप भक्तितत्त्वातून वास्तवाचे दर्शन घडविताना लोकजीवनातील भक्तीची गंगा अखंड वाहती ठेवून उभ्या केलेल्या जीवनवादी विवेकदर्शनाची झलक या ट्रेलरमधून दिसुन येते आहे. प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत आहेत तर त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे त्यासोबत मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, अभिजित श्वेतचन्द्र, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अवधूत गांधी, नुपूर दैठणकर, तेजस बर्वे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. अवधूत गांधी, बेला शेंडे, अजय पूरकर, जयदीप वैद्य, अजित विसपुते, चंद्रकांत माने, नूतन परब, अमिता घुगरी, मुक्ता जोशी, ईश्वरी बाविस्कर, ज्ञानेश्वर मेश्राम, केदार जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्हीएफएक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.

पॅनोरमा स्टुडिओज जगभरात (वर्ल्ड वाईड) या चित्रपटाचे वितरण करणार आहे.

8 months ago | [YT] | 11

Rajmudra Films Official

हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे.
यांच्या भावनांशी खेळलात,
तर याद राखा...
गाठ माझ्याशी आहे.

"पुन्हा शिवाजीराजे भोसले"
याजसाठी केला होता अट्टहास

#PunhaShivajirajeBhosale #ComingSoon

Written & Directed by:
@maheshmanjrekar

Produced by:
#RahulPuranik
#RahulSugandh

Dialogues : @kahanibazz

Starring:
@siddharthbodkeofficial
@treesha.thosar02_official

1 year ago | [YT] | 10

Rajmudra Films Official

अव्यक्त आकार आकारले रूप । प्रकाशस्वरूप बिंबलेसे ।।

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत तेजस बर्वे

अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम म्हणजे
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली.

वारकरी संप्रदायात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. भक्तीमार्गातील त्यांचे योगदान अनमोल असून हरिपाठातील अभंग आजही प्रेरणा देतात. ज्ञानेश्वर माउलींनी आळंदी येथे समाधी घेतली, परंतु त्यांची माणूसधर्माची विचारधारा अजरामर आहे. संत ज्ञानेश्वरांनी समाजाला समता, मानवता आणि प्रेम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. त्यांच्या शिकवणीतून अखंड माणुसकीचा, करुणेचा झरा वाहतो म्हणून त्यांना ‘माऊली’ असे संबोधले जाते.

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असलेल्या माऊलींनी मराठी भाषेत ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिहून वेद-उपनिषदांचे गूढ सामान्यजनांसाठी उलगडले. त्यांनी ‘अमृतानुभव’ ग्रंथातून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या ओवीबद्ध लेखनशैलीत सहजता असूनही त्यात गहन आध्यात्मिक अर्थ आहे. अशा या माऊली ज्ञानेश्वरांच्या लाडक्या बहिणीची चरित्रकथा येत्या १८ एप्रिलपासून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची जनमानसाच्या काळजात घर करणारी भूमिका या चित्रपटात तेजस बर्वे हा गुणी कलाकार साकारणार आहे. मराठी रंगभूमीची पार्श्वभूमी असलेला तेजस गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. माऊलींच्या रुपात तेजसने आळंदीच्या समाधी मंदिराच्या गाभार्‍यातून प्रांगणात प्रवेश केला तेव्हा प्रत्यक्ष माऊली मंदिरात अवतरल्याचा भास झाला, असे अनेकांनी म्हटले. अव्यक्त आकार आकारले रूप । प्रकाशस्वरूप बिंबलेसे ।। असा आनंदानुभव उपस्थितांनी घेतला. कित्येक भाविक त्याला पाहून गहिवरले, कित्येकांना त्याच्या पायी वंदन केल्याशिवाय राहावले नाही. केवळ माऊलींसारखे दिसणेच नव्हे तर माऊलींचे असणेही वाटावे यासाठी, या चित्रपटात माऊली साकारण्यासाठी तेजसने प्रचंड अभ्यास आणि मेहनत केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हृद्य भावाबहिणीचे नाते ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात आपल्याला अनुभवता येणार आहे.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

1 year ago | [YT] | 16

Rajmudra Films Official

शंभूराजांच्या नंतर औरंगजेबाच्या
अंतापर्यत काय घडलं ?
कोण होती रणरागिणी ताराराणी ?
याचे उत्तर मिळेल या नाटकात..

लेख‌ साभार
डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर
936030860

marathistatus.co/ranragini-tararani/

शिवरायांचा छावा गेला…
मग मराठी साम्राज्याचं काय झाल ?

औरंगजेब मेला तेव्हा काय परिस्थिती होती ?
त्या मधल्या काळात काय काय घटनाक्रम घडलेत ?
स्वराज्याच्या लढाईत कुणी साथ दिली ?
कुणावर गद्दारीचा ठपका ठेवला गेला ?
कोण स्वराज्याच्या लढाईत शहीद झाला ?
कुणी स्वराज्याची धुरा सांभाळली ?

कोण होती ताराराणी ?
आणि तिला रणरागिणी का म्हणायचे ?

अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मनात का येवू नये ?

हा योगायोग तर नक्कीच नाही
सध्या मोठ्या पडद्यावर “छावा” चित्रपट महाराष्ट्राच्या नाही तर अख्या हिंदुस्थानातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवत असताना शिवछत्रपतींचा छावा गेल्यानंतर इतिहासात काय घडले ? संभाजीराजांवर अतिशय निर्दयीपणे, निष्ठुरपणे छळ करून जीव घेणाऱ्या त्या औरंगजेबाचे काय झाले ?
संभाजी राजानंतर धुरा कुणी सांभाळली ? येसूबाई, राजे राजाराम, ताराराणी आणि इतरही महत्वाच्या व्यक्तींची स्वराज्याच्या लढाईत काय भूमिका होती ? २७ वर्षाचा स्वातंत्र्य लढा कसा होता ? हे दाखवणाऱ्या नाटकाने याच काळात मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. हा केवळ योगायोग तर नक्कीच नसावा, कदाचित छत्रपती संभाजी राजानंतर पुढील इतिहास महाराष्ट्रातील लहान थोर सर्वांच्या नजरेत यावा याकरिता श्री ने केलेली ही तडजोड असावी. असेच म्हणावे लागेल.

मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक व्यक्तिमत्व, कामगिरी, स्वराज्याची कल्पना ते प्रत्यक्ष कृती, गनिमी कावा, पराक्रम, जय, पराजय, तह, आहुती, बलिदान, स्वराज्याची घोडदौड यापुरता मर्यादित आपण सामान्य जनतेला ज्ञात आहे‌ आणि तेसुद्धा पूर्णपणे तर नाहीच, शालेय शिक्षणामध्ये सुद्धा मर्यादीतच तो शिकवला जातो. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर काय घडलं हे फारच कमी प्रमाणात जनसामान्यांना माहिती आहे.

धाडसाला सलाम..

आणि तो इतिहास माहिती व्हावा याकरिता ब्रिगेडियर सुधीरजी सावंत यांच्या संकल्पनेतून, चंद्रकांत (अण्णा) सावंत यांच्या मार्गदर्शनातून जवळपास ५० कलाकार, संगीत, प्रकाश, नेपथ्य, Back Stage तंत्रज्ञ यांच्या मेहनतीने एक अप्रतिम भव्य ऐतिहासिक नाट्यकृती निर्माण झाली ती म्हणजे “रणरागिणी ताराराणी” लेखक युवराज पाटील यांनी उत्तम लेखन केले असून दिग्दर्शक विजय राणे यांनी अतिशय सुंदर दिग्दर्शन केले आहे आणि कलाकारांचे काम हे तुम्हाला इतिहासात नक्कीच घेवून जातील. रक्त सळसळनं कशाला म्हणतात ? अंगावर काटा उभा रहाण कशाला म्हणतात ? एखाद्या इतिहासातील पात्रावर प्रेम करणे, त्याचा अभिमान वाटणे कशाला म्हणतात ? औरंगजेब सारख्या पात्राचा तिरस्कार वाटणे कशाला म्हणतात ? हे सर्व अनुभवायचे असेल तर नक्कीच तुम्ही प्रत्येकाने हे नाटक नाट्यगृहात जावून बघावेच आणि हि सुंदर नाट्यकृती प्रेक्षकांसाठी सादर करण्याकरिता घेतलेला धाडसी निर्णय ज्यांनी घेतला‌ आणि या निर्णयाला पूर्णत्वास नेण्याकरिता निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, कलाकार म्हणून, तंत्रज्ञ म्हणून ज्यांनी ज्यांनी हातभार लावला या सर्वांच्या धाडसाला, कर्तुत्वाला सलाम…

नाटक का बघावं..

नाटकाची सुरुवात तिथून होते जिथे संभाजी महाराजांचा छळ होतोय, पण स्वराज्यासाठी झटणारा आमचा वाघ तटस्थपणे उभा राहतो आणि त्या औरंगजेबाची महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत होत नाही…
केवळ अप्रतिम..
मी अजून व्यस्ततेमुळे छावा चित्रपट बघितला नाही पण नक्कीच त्या चित्रपटाचा अंत संभाजी महाराज स्वाभिमान राखून न झुकता जग सोडून गेले यानेच होत असावी… तिथूनच हे नाटक सुरु होतं आणि पुढील घडामोडी अप्रतिम रित्या सादर करण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी केला आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा यशस्वीपणे ते सादर केले आहे असे म्हणावे लागेल..

कलाकारांच्या साथीला उत्तम संगीत, उत्तम प्रकाश योजना तर आहेच पण इतिहासाला जिवंत करण्याकरिता प्रसाद ओक सर यांच्या आवाजाने साथ दिली आहे. ती सुद्धा आपल्याला इतिहासाची फेरी मारून आणते, घटनाक्रम पुढे नेण्याकरिता, समजून घेण्याकरिता त्यांच्या आवाजाची मदत होते, नेपथ्य खूपच सुंदर आहे, त्यापेक्षा त्यामागील मेहनत हि खूप मोठ्या प्रमाणातली आहे हे एक प्रेक्षक म्हणून जाणवते. एवढ्या लवकर आणि येवढ्या कमी वेळात कित्येकदा सेट चेंज करणे हे काही सोपी गोष्ट नाही. ती सुद्धा जबाबदारी पडद्यामागील कलाकारांनी लीलया पेलली आहे. त्यांचे पण आभार मानावे तितके कमीच. विशेष म्हणजे या नाटकात युद्धाचे प्रसंग दाखवलेले आहेत तेही खऱ्या तलवारी वापरून. युद्धाच्या वेळी तलवारींचा आवाज प्रेक्षकांच्या कानात जात होता आणि इकडे आमच्या मनाची घालमेल होत होती. सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलेले आहे. सर्वांची मेहनत आपल्याला इतिहासाचा एक सुंदर अनुभव देवून जाते.

आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याणच्या प्रयोगाविषयी विशेष

श्री सुनील गोडसे सर जे या नाटकात औरंगजेबाची भूमिका साकारत आहेत त्यांची काल एका दुसऱ्या निमित्ताने भेट झाली आणि त्यांना ठरल्या वेळेपेक्षा आधी जावे लागले. त्यामागील कारण विचारले असता या नाटकात ताराराणी ची भूमिका बजावणाऱ्या नायिकेच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि उद्याच प्रयोग आहे म्हणून लवकर जावे लागेल असे सांगितले आणि आज आकाश भोसले या मित्राच्या पुढाकाराने मी आणि आकाश दोघेही आमच्या अरसिक पत्नींना घेवून प्रयोगाला पोहचलो आणि प्रयोगाच्या अगोदर मेकअप रूम मध्ये कलाकारांना भेटायला गेल्यानंतर ताराराणीची भूमिका साकारणाऱ्या हिरोईन आल्यात… आल्यात नाही तर दोन तीन व्यक्तींनी आधार देत, एका पायावर त्यांना आणलं. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं.

आणि प्रयोग सुरु झाला…

त्या अगोदर दिग्दर्शकांनी सूचना वजा विनंती केली कि मुख्य नायिकेच्या पायाला दुखापत झालेली आहे म्हणून त्या पायाला सपोर्ट म्हणून लेग सपोर्टर कीट लावून प्रयोग सादर होणार आहे. आणि ऐतिहासिक नाटक असल्यामुळे त्या काळाशी ते सामंजस्य नाही वाटणार पण पर्याय नाही, प्रेक्षकांनी सांभाळून घ्या. ताराराणीची भूमिका करणाऱ्या ताईची अवस्था स्टेजच्या मागे बघितलेली होती. पायाला किती वेदना होत असतील याची कल्पना आम्हाला होतीच. पण जेव्हा जेव्हा त्यांनी रंगमचावर प्रवेश केला आणि
वीर ताराराणीची भूमिका वठवली तर त्या पायाच्या दुखापातीच्या दुःखाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. पण अंधार जरी असला तरी आम्ही चौथ्या रांगेत असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाला त्यांना दोन तीन व्यक्ती विंगेतून आधार देवून रंगमचावर आणत होते आणि Black Out ला लगेच स्टेज वर येऊन त्यांना घेवून जात होते हे आम्हाला दिसत होत. रंगमंचावरचं, कालेवरचे काय भयंकर प्रेम आहे ? Salute… कदाचित पायाला येवढा त्रास होत असताना सुद्धा वीर रणरागिणी ताराराणी ची भूमिका पार पाडायला खुद्द ताराराणीच्या व्यक्तिमत्वानेच त्यांना ताकद दिली असावी.

पूर्ण नाटकामध्ये फक्त स्टेप घेताना पायाची हालचाल थोडी त्रासदायक दिसत होती. पण चेहऱ्यावर वीरता, स्वराज्यावरचं प्रेम, कठोर निर्णय घेतानाचा आवेश कुठेही कमी दिसू दिला नाही. या करिता खरच त्यांना मानावं लागेल.

आम्ही जवळ असल्याकारणाने स्टेज वरची एक एक हालचाल आम्हाला जवळून दिसत होती. दुसऱ्या अंकामध्ये माझ्या सौ. ने कानात सांगितले कि पहिल्या अंकापेक्षा आता दुसऱ्या अंकात तारा राणी ची भूमिका वठवणाऱ्या नायिकेचा पाय सुजलेला आहे. काय त्या वेदना असाव्यात..
पण त्या जाणवू न देता Show Must Go On म्हणून रंगमंचावर वावरणाऱ्या ताईला लाख लाख सलाम. एकंदरीत सर्व कलाकारांचे काम हे दमदारच होते. त्यात साकारलेला औरंगजेब सुनील गोडसे सरांनी सुंदर साकारला आहे. प्रेक्षकांच्या अगदी मनापासून शिव्या निघत होत्याच तर काही ठिकाणी त्याच्यावर, त्या औरंगजेबाच्या मर्यादेवर तुच्छतेने हसूही येत होतं. हे हि एक प्रकारचे यशच म्हणावे लागेल. सर्व कलाकारांचे काम अप्रतिमच होते. त्याने तुम्हाला इतिहासातला काळ अनुभवायला मिळतोच.

असं एकंदरीत सुंदर, इतिहासात घेवून जाणारं, बऱ्याच गोष्टींची उकल करणारं हे नाटक प्रत्येक गावात, तालुक्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहचावं असं ब्रिगेडियर सावंत सर म्हणाले आणि खरच हे नाटक प्रत्येकाने बघावं, मोठ्यांनी तर बघावच..
पण लहान मुलांनी, युवकांनी हे नाटक आवर्जून बघायला हव.

या नाटकाच्या फोटो Whats App स्टेटस ला ठेवल्या ठेवल्या माझ्या नागपूर च्या एका वकील मित्राचा MSG आला कि हे नाटक आपल्या तालुक्याच्या ठिकाणी करता येईल का ? हे त्यांना वाटावं यातच यश आहे. नक्कीच लवकरच महाराष्ट्राच्या गावागावात हे नाटक पोहचावं
हि श्री चरणी प्रार्थना..

डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर

936030860

1 year ago (edited) | [YT] | 26

Rajmudra Films Official

उधळले विश्वात ह्या कैक रंग कुणी
एक रंग घडविते ही क्षेत्र रंगभूमी
सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी
नम्र विजेत्यांचे अस्मान रंगभूमी
गुणी दिग्गजांचा ही श्वास रंगभूमी
गंधर्व, पु.ल., वि.वांचा इतिहास रंगभूमी
मज नवख्याचेही झेलते ही पाय रंगभूमी
अन लेकरागत घडविते ही माय रंगभूमी

संकर्षण कऱ्हाडे

2 years ago | [YT] | 23

Rajmudra Films Official

कुमार सोहोनी
एक सुवर्णमहोत्सवी रंगप्रवास

https://youtu.be/goLLQQA6otc?si=zw9OD...

कुमार सोहोनी यांची नाट्यकारकिर्द म्हणजे एक वेगवान नाट्य प्रयोगशाळाच! अशी प्रयोगशाळा जी उभ्या नाट्यसृष्टीला दिशा देणारी ठरलीय. दोनअडीच वर्षे त्यांच्यासोबत नाटके बघण्याचा योग जुळून आला होता. राज्य नाट्य अनुदानाच्या समितीत ‘परीक्षक’ म्हणून आमच्या समोर आलेल्या नाटकांवर त्यांच्याशी बोलण्याची, चर्चा करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्यांच्या नाट्य जाणीव जवळून अनुभवण्याची प्रचिती आली. ‘नाटक’ त्यांचे जसं सर्वस्वच. नवनवीन संहिता, नवोदित कलाकार, सादरीकरणातले वेगळेपण याकडे त्यांची पक्की नजर असायची. आज कुमार सोहोनी हे नाव देशभरात एक ‘नाट्यस्कूल’ म्हणून पोहचले आहे. जे मराठी माणसांच्या दृष्टीने अभिमानाची घटनाच आहे.

दोन घटनांचा उल्लेख करावा लागेल. एक त्यांना मिळालेले दोन पुरस्कार आणि सन्मानाबद्दल आणि दुसरी घटना म्हणजे त्यांनी ठाण्यात स्थापन केलेल्या ‘कलासरगम’ या प्रायोगिक नाट्य चळवळीचा नाबाद पन्नाशीचा सुवर्णसोहळा! याचा आढावा एका दमात येणं जरी शक्य नसलं तरी राज्यनाट्यस्पर्धेपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत आणि चित्रपटापासून ते नाट्य-सिने तंत्रांपर्यंतचा आवाका मोठा आहे. ‘एक परिपूर्ण दिग्दर्शक’ म्हणून त्यांनी गेली पन्नासवर्षे केलेला रंगप्रवास हा एका कालखंडाचा थक्क करून सोडणारा प्रवाहच. जो नवोदितांना खुणावतो आणि प्रेरणाही देतोय.नरेंद्रकुमार नरहर सोहोनी नावाचा तरुण जो ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात दिसायचा त्याने आपल्या जवळपासच्या मित्रांना गोळा केले आणि ‘कलासरगम’ नावाची नाट्य संस्था ४ मे १९७३ या दिवशी सुरू केली‌. सारेजण शाळकरी. पण नाटक पुरतं शिरलेलं. या युवकाच्या घरातले वातावरण हे पूर्ण सेवादलातले. त्यामुळे बालपणापासूनच स्टेजवर पुढे राहाण्याचे धडे नकळत झालेले. अगदी वयाच्या चारपाच वर्षाचा असतांना ‘चिनी आक्रमणाचा फार्स’ यातून राष्ट्रसेवा दलाच्या निर्मितीत सहभाग घेतलेला. पुढे एकीकडे ‘कलासरगम’ या नाट्यसंस्थेचे काम आणि ‘मुंबईची लावणी’ हे शाहीर दादा कोंडके यांच्या लोकनाट्याचे दिग्दर्शन त्याने पेलले. ठाण्यातल्या या तरुणांच्या ग्रुपकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष हे हौशी नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक निर्मिती – यातून वेधले गेले आणि पन्नास वर्षांपूर्वी ‘कलासरगम’ म्हणजे ठाण्यातली नाट्यचळवळ अशी ओळख झाली. नरेंद्रकुमार उर्फ कुमार सोहोनीकडे नाट्यसृष्टीचे लक्ष पोहचले.

मराठी रंगभूमीवर असलेला प्रत्येक घटक हा कधी ना कधी राज्यनाट्य स्पर्धेच्या मांडवाखालून जातच असतो. राज्यानाट्यस्पर्धा आणि अनेक एकांकिका स्पर्धेने महाराष्ट्रातील गावागावातल्या रंगकर्मींच्या आयुष्यात प्रगतीच्या वाटा खुल्या केल्यात हे नाकारून चालणार नाही. एक जबरदस्त सामर्थ्य देणारी ही स्पर्धा जी कुमार सोहोनी यांच्या जीवनातही एक वळण ठरली. ‘ठाणे केंद्र’ म्हणजे त्याकाळी ‘कलासरगम’चे हक्काचे निशाण ठरले. अंधार यात्रा, श्रवणतरंग, असायलम् असंच एक गाव. अरूपचं रूप, मा सबरीन, अथं मनूस जगन हं’ – अशा एकापेक्षा एक नाटकांमुळे त्यांच्यातला दिग्दर्शक बहरत गेला. नाटक स्पर्धेत सादर झालं आणि बक्षिसे मिळाली की ती संस्था किंवा नाट्यचळवळ पुढे कायम राहाते पण नेमकं उलट झालं तर मरगळ येण्याचा धोका असतो. पण ‘अथं मनूस जगन हं’ या नाटकामुळे साक्षात डॉ. श्रीराम लागू यांनी कुमारजींच्या दिग्दर्शन कौशल्याला ओळखले. व्यावसायिक रंगभूमीची दारे अलगद उघडली गेली. नवी दिशा त्यांना मिळाली.

२० वी राज्यनाट्य स्पर्धा असावी. त्यात मुलुंडच्या ‘संस्था’ तर्फे ‘अरुपचे रुप’ नावाची श्रीहरी जोशी यांची संहिता निवडली गेली. कल्पकतेने दिग्दर्शन करून नाट्य ही स्पर्धेत तृतीय क्रमांकावर पोहचले आणि दिग्दर्शक म्हणूनही कुमारजींना द्वितीय पुरस्कार मिळाला. याच संस्थेने या २४ व्या राज्य नाट्यस्पर्धेत प्र. ल. मयेकर यांचे ‘अथ मनूस जगन हं’चा प्रयोग केला तोही गाजला. प्रथम पुरस्कार मिळाला तसेच नेपथ्य रचनेसाठी त्यांना बक्षिस मिळाले. एकूणच राज्य नाट्यस्पर्धेत यंदा कुठलं नाटक? हा प्रश्न तसा परवलीचा ठरला होता. तो काळच मंतरलेला. त्याचे कित्येक किस्से आहेत ज्यातून त्यांच्यातला दिग्दर्शक आणि संघटक हा घडत गेला… नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्लीचा चक्क तीन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. देश-विदेशातील नाटकांवर अभ्यास केला. नाटकाचे तंत्र-मंत्र जाणून घेतले. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात एका प्रकारची परिपक्वता आली. या अभ्यासक्रमानंतर त्यांनी ‘अरुपाचे रूप’ या हौशी – प्रायोगिक नाटकाचे दिग्दर्शन केले. वेताळ पंचविशीच्या ‘फॉर्म’मध्ये त्याचे सादरीकरण झाले. ‘नाटक’ असेही असू शकतं! – अशी पोचपावती त्याला मिळाली त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. प्र. ल. मयेकर यांचे माऊस साबरीन, अज्ञांत इतिहास, अग्निपंख, रातराणी, रेशमगाठ – ही नाटके त्यांनी दिग्दर्शित केली प्रल आणि कुमारजी याचं ट्युनिंग मस्त जमलं होतं. प्रसाद दाणी याचे अर्धसत्य, किरण माने याचे उलटसुलट, अभिराम भडकमकर याचे हसता हा सवता, रणजित देसाई यांचे स्वामी, अभिराम भडकमकर याचे सुखांशी भांडतो आम्ही, डॉ. आनंद नाडकर्णींचे जन्मरहस्य, शेखर पाटील याचे मी रेवती देशपांडे, सुरेश जयराम यांचे कहानी में ट्वीझ!.. अशी नाबाद पन्नास नाटकांत विविध शैली, अनेक तंत्रमंत्र याचा कल्पकतेने वापर त्यांनी केला. वेळोवेळी नाटकात आलेली मरगळ त्यांनी दूर केली. रसिकांनाही नाटक बघण्याची नवी दृष्टी त्यातून मिळाली.

कुमार सोहोनी यांच्या नाट्यवाटचालीतल एक सुवर्णपर्व म्हणजे आचार्य अत्रे यांचे लग्नाची बेडी हे नाटक! ज्याचे दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य हे सबकुछ त्यांनी केले. १९८७ साली महिनाभर महाराष्ट्रभरात न भूतो न भविष्यती दौराही केला. १९२१ च्या नटश्रेष्ठ बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या युतीनंतर तब्बल ६६ वर्षांनी त्याच तोलामोलाचे कलाकार पुन्हा एकत्र आणले गेले. सामाजिक कृतज्ञता निधी करीता महिन्याभरात नॉनस्टॉप २१ प्रयोग गाजले. डॉ. श्रीराम लागू आणि कुमारजी यांच्यातली ‘नाट्यबेडी’ त्यातूनच पक्की झाली. सर्व खर्च वजा आता ३५ लाखाचा निधी त्यातून गोळा झाला‌. पैशापेक्षा अनुभवांनी त्याच्यातला रंगकर्मी गर्भश्रीमंत यातून झाला. म्हणून या नाटकाला त्यांच्या कारकिर्दीत लाखमोलाचे महत्त्व आहे. डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर, निळू फुले, सदाशिव अमरापुरकर, सुधीर जोशी, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी, भारती आचरेकर, मधुकर नाईक, वसंत इंगळे, विजय म्हैसकर आणि रश्मीच्या भूमिकेत ‘सिनेस्टार’ तनूजा. याचा सहभाग होता. ‘लग्नाची बेडी’ याची रंजक कहानी खुद्द त्याच्या तोंडून ऐकणं म्हणजे एक नाट्याविष्कारच ठरेल! असो. नाटकांप्रमाणे त्यांनी १९९० पासून वीसएक चित्रपटांना दिग्दर्शन दिले. मराठी नाटकातील कलाकारांना चित्रपटात संधी मिळाली. ‘एक रात्र मंतरलेली’ या चित्रपटाच्या निर्मितीसह त्यांनी दिग्दर्शन केले. तर १९९७ साली ‘वहिनीची माया’ या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संकलन अशा तिहेरी भूमिका त्यांनी पार पाडल्या. आहुती, अनुराधा, पैसा पैसा पैसा, जिगर, बजरंगाची कमाल, जोडीदार, तुझ्याविना, रेशमगाठ, सवाल माझ्या प्रेमाचा, करायला गेलो एक, निरुत्तर – हे काही चित्रपट ज्यातून त्यांच्यातल्या ‘कॅमेरा’वरल्या हुकमी तंत्राचे दर्शन झाले खरे पण ते सर्वार्थाने रमले, फुलले ते नाटकातच! गेल्या तिसएक वर्षात व्यावसायिक रंगभूमीवर त्यांची आलेली बहुतेक सर्व नाटके बघण्याचा, त्यावर परीक्षण करण्याचा योग चालून आला आणि त्यांच्यातला दिग्दर्शक प्रत्येक नाटकातून अधिकाधिक जाणवला. कितीही ‘ग्लॅमरस’ कलाकार जरी असले तरी दिग्दर्शकाची चौकट ही नेहमी बाजी मारून गेली. रंगमंचाचे नेमकेभान असलेले त्याची ट्रिटमेंट तशी लाजवाबच!

‘मी रेवती देशपांडे’ हे नाटक. जे श्री चिंतामणीच्या लता नार्वेकर यांनी रंगमंचावर आणले. स्त्री प्रश्नावर असलेल्या विषयांना स्पर्श करणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा लताबाईंनी यातून सांभाळली. शेखर पाटील यांची संहिता होती. जी ‘नाट्य’ म्हणून विलक्षणच. जेंडर डिसऑर्डर’ यावरलं हे नाट्य. तसे‌ सादर करणे आव्हानात्मक होते. अगदी प्रकाशयोजने पासून ते मोहन जोशी यांच्या ‘रविशंकर’चा ‘रेवती’पर्यंतचा तपशील हा अभ्यासपूर्णच. ‘रेवती’ आजची चर्चेत असते. त्यांनी दिग्दर्शित केलेलं आणखीन एक नाटक जे २०१३-१४ च्या सुमारास रंगभूमीवर आलं ते म्हणजे ‘जन्मरहस्य’. मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची संहिता. त्यात तिला भाटे आणि अमिता खोपकर यांच्या प्रमुख भूमिका. युवराज अवघानी ही सोबत घेतले होते. कठीण विषय हा सहजसुंदर प्रकारे श्रीराम पुढे त्यांनी पेश केला नाहीतर रसिकांना कळणं कठीण झालं असतं. डोक्यावरून गेलं असतं पण त्यांच्यातल्या दिग्दर्शकाने आणि चांगली ट्रिटमेंट दिली. प्रकाशयोजनाही लक्षवेधी होती. ‘जबरदस्त नाट्यानुभव’ म्हणून रसिकांनी त्यावेळी नाटकाला उचलून धरले. मच्छिंद्र कांबळे यांच्या ‘भद्रकाली’ने जे काही मालवणी भाषे व्यतिरिक्त प्रयोग केले त्यात ‘सुखांशी भांडतो आम्ही!’ हे २०११- १२ च्या सुमारास आलेलं नाट्य‌. अभिराम भडकमकर यांचे संहिता आणि डॉ. गिरीश ओक व चिन्मय मांडलेकर या दोघांच्या प्रमुख भूमिका जे त्याकाळात अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. समीक्षक, परीक्षक यांनी दिग्दर्शनाचे कौतुक केले. त्यातील वैशिष्ट्यांची दखलही घेतली. कुमार सोहोनी यांची व्यावसायिक नाटके यावर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल येवढी त्यात विविधता तसेच तंत्रावर हुकमत आहे. दिग्दर्शक म्हणजे ‘तालीम मास्तर’ नाही तर सर्व दालनांवर नजर असलेला ‘प्रतिभासंपन्न नेतृत्व’ आहे, हे चित्र त्यांचे प्रत्येक नाटकातून प्रकाशात आणले.

संगीत नाटक अकादमीचा त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा मिळालेला सांस्कृतिक पुरस्कार
हे दोन्ही सन्मान त्यांना गेल्या काही दिवसात मिळाले आणि पुन्हा एकदा एका रंगकर्मीने केलेल्या रंगसेवेचा भूतकाळ जिवंत झाला. ठाण्याच्या त्यांनी स्थापन केलेल्या ‘कलासरगम’ या प्रायोगिक, हौशी ही नाट्यचळवळीनेही सुवर्णमहोत्सवी निशाण फडकविले. कलासरगमचा सुवर्णमहोत्सवी रंगसोहळा रसिकांनी अनुभविला. यामागे असलेल्या एका रंगप्रवासाचे अभिनंदन!

संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com

* नाटक
अग्निपंख
रातराणी
लग्नाची बेडी
वासूची सासू
देखणी बायको दुसऱ्याची
देहभान
शेवटचे घरटे माझे
अश्रूची झाली फुले
तुजविण
मी रेवती देशपांडे
मायलेकी
उलट सुलट
जन्मरहस्य
सुखांशी भांडतो आम्ही
कहानी मे ट्विस्ट
याच दिवशी याच वेळी
सागरा प्राण तळमळला

* चित्रपट
एक रात्र मंतरलेली
आहुती
अनुराधा
बजरंगाची कमाल
वहिनीची माया
पैसा पैसा पैसा
लपून छपून
जिगर
रेशीमगाठी
जोडीदार
तुझ्याविना
छडी लागे छमछम
निरुत्तर

* मालिका
कालचक्र
हिसाब
पती, पत्नी और वो
संस्कार
किमयागार

2 years ago (edited) | [YT] | 20